MadeInIndia आजच्या जगात पर्यटन, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच आर्थिक, लष्करी, सामरिक आणि राजकीय युती निर्माण करण्यासाठी देशाचे व देशाच्या बलस्थानांचे नियोजनपूर्वक ब्रँडिंग करणे क्रमप्राप्त आहे.
जागतिक व्यवस्थेत आपले वेगळेपण प्रस्थापित करण्यासाठी त्या देशातील इतिहास, संस्कृती, अर्थव्यवस्था, समाज, भूगोल आणि त्यांचे परस्परातील संबंध रेखाटून देशाच्या बलस्थानांचे ब्रँडिंग करण्यात येते. आधुनिक जगात तसे करणे क्रमप्राप्त आहे.
आपण आपल्या प्रवासाचे/सहलीचे ठिकाण कसे ठरवतो? किंवा गुंतवणूकदार एखाद्या विशिष्ट देशात अथवा प्रदेशात गुंतवणूक करण्याचा निर्णय कसा घेतो? किंवा ‘आय लव्ह न्यूयॉर्क’ ‘विवे ला फ्रान्स’; ब्राझील ‘सेन्सेशनल’ किंवा ‘मेड इन जर्मनी’ यासारख्या या संज्ञांचा अर्थ काय आहे?… एखाद्या देशाकडे किंवा ठिकाणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बऱ्याचदा तिथे असलेल्या वैशिष्ट्यांशी जोडलेला असतो. त्या त्या गोष्टी त्या देशाला एक ओळख मिळवून देतात. ही ओळख फार महत्त्वाची ठरते.
वेगवेगळ्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे ती तयार होते, हे खरेच, पण ती जाणीवपूर्वक आणखी दृढ करता येते. सध्याच्या स्पर्धात्मक दुनियेत काही उत्पादनेदेखील अशी ओळख त्या त्या देशाला मिळवून देत असतात. उदाहरणार्थ, स्विस घड्याळे, इटालियन खाद्यपदार्थ, फ्रेंच परफ्यूम आणि जर्मन कार इत्यादी. अलिकडच्या काही वर्षांत, देशाचे किंवा एखाद्या ठिकाणाचे ब्रँडिंग करण्याचे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. हा विषय केवळ त्या त्या देशातील एखाद्या उत्पादनाच्या विपणनापुरता मर्यादित राहिला नसून,आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीतदेखील देशाचे ब्रँडिंग हे एक महत्त्वाचे साधन झाले आहे, हे जागतिक घडामोडींवर बारकाईने नजर टाकल्यास सहज लक्षात येते.
सामान्यतः ब्रँडिंग म्हणजे एक विशेष ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. देश किंवा राष्ट्र हे एक गुंतागुंतीचे सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक अस्तित्व असलेला भूभाग असतो. म्हणूनच देशाचे ब्रँडिंग करणे ही एक अत्यंत काळजीपूर्वक करावयाची बाब आहे. जागतिक व्यवस्थेत आपल्या देशाचे वेगळेपण प्रस्थापित करण्यासाठी त्या देशातील इतिहास, संस्कृती, अर्थव्यवस्था, समाज, भूगोल आणि त्यांचे परस्परातील असलेले संबंध रेखाटून देशाच्या बलस्थानांचे ब्रँडिंग करण्यात येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशा-देशांमध्ये संसाधने, मूल्ये तसेच प्रतिष्ठा यांबाबत तीव्र स्पर्धा असते. पर्यटन, गुंतवणूक, उच्च दर्जाचे मानवी भांडवल आकर्षित करण्यासाठी तसेच आर्थिक, लष्करी, सामरिक आणि राजकीय युती निर्माण करण्यासाठी नियोजनपूर्वक ब्रँडिंग हे एक महत्त्वाचे साधन आहे.
मध्ययुगीन काळापासून जगभरात भारताची ओळख मसाले आणि कापसाचा तसेच जरीच्या वस्त्रांचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार म्हणून होती. परंतु दुर्दैवाने याच प्रतिमेमुळे साम्राज्यवादी देशांनी भारतावर आक्रमण करून सत्ता मिळवली. याचा अनिष्ट परिणाम म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था तर उद्ध्वस्त झालीच; त्याचसोबत आपली अस्मिता आणि सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणही उसवली गेली. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारताची प्रतिमा गारुड्यांचा देश म्हणून प्रसारित केली गेली. स्वातंत्र्यानंतरही डिक्सन ओवेन यांनी आपल्या ‘द ग्रेट डिव्हाइड’ या पुस्तकात भारताचे वर्णन दारूगोळा साठवलेले, महासागराच्या मध्यात फुटलेले नि पेटलेले जहाज असे केले होते. हे जहाज नक्कीच बुडणार असे भाकीत केले होते. हे जहाज बुडले तर नाहीच; पण ते किना-याला लागले आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही बनून आज स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत आहे.याचे श्रेय आमच्या सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि त्या काळातील नेत्यांना आहे.
भारताचे स्थान
आजच्या परिस्थितीचा विचार केला तर जागतिक पटलावर भारत कुठे आहे? आधुनिक जग हे लोकशाही मूल्ये, आर्थिक सुबत्ता, व्यापार, अन्नधान्याचे उत्पादन, तंत्रज्ञान, पर्यावरण, लष्करी सामर्थ्य व सुरक्षा आणि सांस्कृतिक ओळख यांच्याभोवती फिरते आहे. आपल्या फक्त ७५ वर्षाच्या कालावधीत भारताने या सर्वच क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहेच; त्याचसोबत इतर अनेक देशांना भारताने दिशादर्शकाचे काम केले आहे.
१. लोकशाही मूल्ये : २० व्या शतकात सुमारे ६३ देश स्वतंत्र होऊन स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. यापैकी भारत हा अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या देशांपैकी एक आहे जिथे सुदृढ लोकशाही निर्माण झाली, तिचा प्रसार झाला आणि रूजली.
२. अर्थव्यवस्था : जागतिक पटलावर डॉलरमध्ये मोजले असता आपण जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहोत. तेच खरेदी करण्याचा क्षमतेत (पीपीपी) मोजमाप केल्यास आपण तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहोत. जगातील सर्वात मोठे आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून आपली ओळख आहेच त्याचसोबत कोरोना नंतर जी-२० देशांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपण उदयास आलो आहोत.
३. अन्नधान्यांचे उत्पादन : जगातील सर्वाधिक धान्याचे निर्माण आणि वितरण आपण करतो.
४. पर्यावरण : हरितगृह वायूंचे उत्सर्जन करण्यात आपला चौथा क्रमांक आहे. पर्यावरण संदर्भातील कोणतेही जागतिक धोरण भारताला बाजूला ठेवून करता येत नाही.
५. लष्करी सामर्थ्य : आपण एक जबाबदार लष्करी राष्ट्र म्हणून विकसित झालो आहोत. आपल्याला चार युद्धांचा अनुभव आहे तसेच आपण अणुबॉम्ब विकसित केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सभासदत्वासाठी आपण प्रयत्नशील आहोत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताने नेहमीच नेतृत्व केले आहे.
६. तंत्रज्ञान : आज आयटी आणि अंतराळ तंत्रज्ञानात भारत एक अग्रेसर देश आहे.
७. संस्कृती आणि धर्म : मानवी संस्कृती आणि धर्माचा खजिना भारतात आहे. मार्क ट्वेन हे प्रख्यात विनोदी लेखक. त्यांनी भारताचे वर्णन करताना म्हटलेच आहे, की ‘‘India is the cradle of the human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend, and the great grandmother of tradition.’’
(भारत हे मानववंशाच्या जडणघडणीचे स्थान आहे. मानवी अभिव्यक्तीचे जन्मस्थान आहे. भारतभूमी ही इतिहासाची माता, दंतकथांची आजी नि परंपरांची पणजी आहे.)
या वेगाने बदलत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत आणि स्पर्धेत भारताने स्वतःच्या सर्व क्षमता आणि बलस्थानांचे आक्रमकपणे ब्रँडिंग केले पाहिजे. उदाहरणार्थ, इस्राईलने हे तंत्र अत्यंत व्यावसायिक बहुआयामी दृष्टिकोनाने २००५पासूनच स्वीकारले आहे. इस्राईलच्या मुत्सद्देगिरीचे अलीकडील यश पाहता (इस्राईल-संयुक्त अरब अमिराती सामान्यीकरण करार -२०२०) अशा नियोजनपूर्वक ब्रँडिंगने महत्त्वाची भूमिका बजावली असावी. इस्राईलच्या उदाहरणावरून असा निष्कर्ष काढता येतो की, या राष्ट्राचे ब्रँडिंग केवळ व्यवसाय, पर्यटन आणि गुंतवणूक आकर्षित करत नाही, तर शांतता प्रस्थापित करण्यास तसेच सलोख्याचे संबंध वृद्धिंगत करण्यास मदत करते. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत असताना भारत आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. कोरोनानंतरची आर्थिक उभारी, अधिक उत्तम प्रशासन आणि कमीत कमी शासन (maximum governance, minimum government) या मंत्रावर चालणारे सरकार, वेगाने विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञानाचा विस्फोट आणि यासोबतीला उच्च ध्येय ठेवून काम शिक्षित तरुण आणि कौशल्य असलेले युवक भारताच्या ‘ब्रॅंड’ला ताकदीने जागतिक पटलावर मांडतील आणि देशाचाच नाही तर जगाचा चेहरा बदलून टाकतील, असा विश्वास वाटतो.