बजाज उद्योगसमूहाचे दिशादर्शक, मराठा चेंबरचे (MCCIA)माजी अध्यक्ष, भारतीय उद्योगविश्वासाठी एक प्रेरणास्थान, परोपकारी, दानशूर व्यक्तिमत्त्व राहुलजी बजाज यांच्यावरील माझा लेख
बजाज हे नाव ऐकले, की जनसामान्याला सर्वप्रथम आठवते ती १९८९ सालची जाहिरात ‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर…हमारा बजाज, हमारा बजाज!’ खरेच मागच्या बऱ्याच दशकांपासून बजाज समूहचा भारताच्या आर्थिक विकासात मोठा वाटा आहे.
बजाज उद्योगसमूह भारताच्या प्रगतीचे एक प्रतीक आहे. या उद्योगसमूहाचे अनेक दशके व्यवस्थापकीय संचालक व अलीकडल्या काळात दिशादर्शक राहिलेले राहुल बजाज यांच्या निधनाची वार्ता मन सुन्न करणारी आहे. राहुलजींच्या निधनाने भारतीय उद्योगक्षेत्राची कधीही भरून काढता येणार नाही, अशी हानी झाली आहे.
पुण्यासाठी बजाज हे जवळपास प्रत्येक कुटुंबाला माहिती असलेले एक नाव आहे. त्यामागे बजाज स्कूटर, सर्वसामान्यांच्या प्रवासाचे हक्काचे बजाज ऑटो व बजाज उद्योगसमूहाची इतर उत्पादने आहेतच, मात्र त्यासोबतच पुणेकरांना सार्थ अभिमान आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे राहुल बजाज हे पुण्याचे असल्याचा. राहुलजी एक परोपकारी, दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. मागच्या काही दशकात व अगदी अलीकडच्या काळात म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावात त्यांनी केलेली मदत ही बऱ्याच कुटुंबांसाठी जीवनदायी होती. सार्वजनिक बाग-बगीच्यांपासून आरोग्यसेवेपर्यंत राहुलजींनी पुण्यासाठी नेहमीच भरभरून दिले आहे.
स्वतःच्या उद्योगसमूहासोबतच पुण्याच्या उद्योगविकासाचा त्यांना ध्यास होता. राहुलजी १९८०-८२ काळी मराठा चेंबरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष होते. मराठा चेंबरच्या विकासात त्यांचा खूप मोठा आर्थिक आणि वैचारिक हातभार लागला आहे. राहुलजी फक्त पुण्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या उद्योगविश्वासाठी एक प्रेरणास्थान होते. महाराष्ट्राच्या अनेक भागात त्यांनी कारखाने उभारले आणि रोजगाराची निर्मिती केली. ‘सीआयआय’सारख्या राष्ट्रीय पातळीवरील उद्योजकांच्या संघटनेचे ते अध्यक्ष होते.
‘सीआयआय’मार्फत आणि इतर संघटनांमार्फत व गरज असेल तेव्हा वैयक्तिक पातळीवर त्यांनी वारंवार देशाच्या उद्योग धोरणांवर व इतर धोरणांवर मार्गदर्शनपर भाष्य केले आहे. राहुलजी एक स्पष्टवक्ते म्हणून देशभर ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक मताशी प्रत्येक जण प्रत्येक वेळी कदाचित सहमत नसेल, मात्र प्रत्येक जण प्रत्येक वेळी त्यांच्या देशभक्त असण्यावर व देशहित डोळ्यापुढे ठेवूनच वक्तव्य केल्याबद्दल नक्कीच सहमत असेल